हाथरस अत्याचार प्रकरणी काँग्रेस, भीमशक्ती, चर्मकार महासंघाची निदर्शने
 मराठा आरक्षणासाठी वैजापुरात जलसमाधी आंदोलन
आर्थिक मदतीच्या मागणीसाठी वाघ्या-मुरळींनी घातला ‘गोंधळ’
 औरंगाबाद शहर आणि जिल्हा आज विविध पक्ष, संघटनांनी केलेल्या आंदोलनाने गाजला. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष, भीमशक्ती संघटना व चर्मकार महासंघाने तर कलाकारांना शासनाने मदत द्यावी यासाठी कलाकार परिषद आणि वैजापुरातील बोरदहेगाव येथे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी धरणात उतरून जलसमाधी आंदोलन केले. त्यामुळे आजचा दिवस आंदोलनाचा ठरला आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका 19 वर्षीय दलित तरुणीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली. हत्येनंतर आरोपींना वाचविण्यासाठी बलात्कार झालाच नाही, असे दाखविण्याचा पोलिसांमार्फत प्रयत्न केला. तसेच तरुणीच्या निधनानंतर तिचे प्रेत नातेवाईकांना न देता पोलिसांनी रात्रीच्या वेळेस अंत्यसंस्कार उरकण्यात आले. पीडितेच्या कुटुंबीयांवर प्रशासनाकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रसिद्धीच्या माध्यमांना व राजकीय पक्षाच्या नेत्यांना रोखण्यात आले. यासर्व बाबींचा निषेध करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भीमशक्ती चर्मकार महासंघाने आंदोलन केले.
काँग्रेसचा सत्याग्रह
उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेचा निषेध करीत शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणाचे पडसाद देशभर उमटले आहेत. विविध संघटना, राजकीय पक्षांनी आंदोलने सुरू केली आहेत. या घटनेचा निषेध म्हणून आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी योगी सरकार बरखास्त करा, दोषींना फाशीवर लटकवा आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया, युवक काँग्रेसचे जितेंद्र देहाडे, अरुण शिरसाट, अजय वाघमारे, इब्राहिम पठाण, सुभाष देवकर, गुलाब पटेल, अॅड. पवन डोंगरे, महिला काँग्रेसच्या सरोज मसलगे, सुरेखा पानकडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
वैजापुरात जलसमाधी आंदोलन
वैजापूर, दि.5 (प्रतिनिधी): सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत योग्य पद्धतीने बाजू न मांडल्याचा आरोप करत शिवक्रांती सेनेच्या वतीने बोरदहेगाव मध्यम प्रकल्पात आज (5 ऑक्टोबर) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जलसमाधी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. नियोजित वेळेच्या अगोदरच गनिमी कावा करत आंदोलन करणार्या शिवक्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांसह सहाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  आंदोलनाच्या अनुषंगाने बोरदहेगाव मध्यम प्रकल्प व परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी या परिसरात सोमवारी सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत कलम 144 लागू केले.
ठरलेल्या नियोजित वेळेच्या अगोदर गनिमी काव्याने एक मराठा, लाख मराठा, अशा घोषणा देत पाण्यात उतरून जलसमाधी घेण्याअगोदर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.
शिवक्रांती सेनेचे अध्यक्ष सुनील बोडखे, सोमनाथ मगर, विक्रम शिंदे, संजय सावंत व इतरांना अटक करून वैजापूर पोलिस ठाण्यात आणले आहे. प्रकल्प परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
भीमशक्ती संघटनेची निदर्शने 
हाथरस बलात्कार प्रकरणा विरुद्ध संताप व्यक्त करीत भिम शक्ती संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. यावेळी योगी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. दोषींना फाशी द्या, योगी सरकार हाय हाय आदी घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी दिनकर ओंकार, शांतीलाल गायकवाड, बाबुराव वाकेकर, पंडितभाई नवगिरे, कैलास जुमडे, राजू मंजुळे, किशोर जाधव, संतोष भिंगारे, विश्वंभर भालेराव, अमोल तुपे, प्रकाश प्रधान, प्रेम चव्हाण, सचिन घोले, राहुल पवार, विक्रम घायतीलक आदींची उपस्थिती होती.
वाघ्या मुरळी परिषदेचा ‘गोंधळ’ 
 वाघ्या-मुरळीची शासन दरबारी नोंद व्हावी, कलावंतांच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावे यासह विविध मागण्यांसाठी वाघ्या मुरळी परिषदेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. पारंपारिक वाद्य आणि नृत्य करीत केलेल्या आंदोलनाने जिल्हाधिकारी परिसर दुमदुमून गेला होता. कोरोना संकटाने समाजाची अवस्था बिकट झाली आहे मुलांचे शिक्षण करणे अवघड बनले आहे ही परिस्थिती बघून शासनाने तातडीने वाघ्या मुरळी कलावंतांना मदत करावी, बेघरांना घर द्यावे, कलावंतांना मानधन द्यावे यासह मुलांना मोफत शिक्षणाची सोय करावी आदी मागण्याचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
 
 
                         
                                













